शिवसेनेशी चर्चेचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना

सत्तास्थापनेची कोंडी फडणवीस कशी फोडणार?

Updated: Nov 2, 2019, 10:24 PM IST
शिवसेनेशी चर्चेचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना title=

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ९ दिवस उलटून गेले आहेत, तरीही सरकार स्थापनेचा दावा कोणत्याही पक्षाने केला नाही. भाजप हा राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष असला तरी त्यांना बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेशी चर्चा करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. राज्यातल्या नेत्यांची बोलणी झाल्यावरच दिल्लीचे नेते लक्ष घालणार आहेत. राज्यातली बोलणी पूर्ण झाल्यानंतरच अमित शाह राज्यात येणार असल्याचं समजंय. तोगडा निघाला नाही तरच दिल्लीचे नेते लक्ष घालतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा महायुतीची घोषणा झाली तेव्हा सत्तेच्या समान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायंच, असा कोणताच फॉर्म्युला नव्हता, हे स्पष्ट केलं. यानंतर भाजप आणि शिवसेनेमधले वाद वाढले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निकालाच्या दिवशीच ५०-५० चा फॉर्म्युला बोलून दाखवला. तसंच वेळ पडली तर अमित शाह यांनी मुंबईत यावं, असं उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते.

एकीकडे सामना मधून आणि माध्यमांमध्ये संजय राऊत भाजपवर निशाणा साधत अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. दुसरीकडे शरद पवार हे उद्या दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राज्यातले काँग्रेसचे काही नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही आग्रही आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ही कोंडी कशी फोडणार हे पाहावं लागणार आहे.