CM शिंदे उद्या 14 खासदारांसह PM मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता

राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता दिल्लीत ही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Updated: Jul 18, 2022, 08:27 PM IST
CM शिंदे उद्या 14 खासदारांसह PM मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाताना दिसत आहेत. शिंदे गटाची मुंबईत आज बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार ऑनलाईन सहभागी झाले होते.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत. पण उद्या शिवसेनेचे हे 14 खासदार या दोघं नेत्यांसोबत गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. या भेटीनंतर दिल्लीत या खासदारांसोबत पत्रकार परिषद होण्याची शक्यता देखील आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आता केंद्रात देखील शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेनेचे 14 खासदार उद्या काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या खासदारांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार का याकडे ही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

आज शिंदे गटाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. यामध्ये विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत शिवसेना पक्षाचे नवे नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही निवड करण्यात आली.

शिंदे गटाने आमदार दीपक केसरकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते पदी तर रामदास कदम, आनंदराव अडसुळ यांची नेते पदी निवड केली आहे. तर यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंकशे, तानाजी सावंत, विजय नाहाटा, शिवाजीराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.