मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि पवार यांच्यातल्या बैठकीला सुरूवात झाली आहे. कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमधील शिथिलता यावर या बैठकीत चर्चा होत आहे.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेरोजी संपत असताना केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. राज्यातही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे, मात्र लॉकडाऊन वाढवता कोणत्या गोष्टींना शिथिलता द्यायची, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. तसंच कोरोना लॉकडाऊनमुळे राज्याचं अर्थचक्र कसे सुरु करायचं? याबाबतही चर्चा होणार असल्याचं समजतंय.
या आठवड्यातली मुख्यमंत्री आणि पवार यांच्यातली ही दुसरी भेट आहे. सोमवारी शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. पण उद्धव ठाकरे सरकार स्थिर असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं.