मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज एच एन रिलायन्स रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. पाठीचं आणि मानेचं दुःखण डोकं वर काढत असल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी परिपत्रकाद्वारे संवाद साधला आहे.
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच !
पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
महाराष्ट्राने लसीकरणात १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 10, 2021
आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे. यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल होणार आहे. मानेच्या आणि मणक्याच्या तपासणीसाठी उद्धव ठाकरे रुग्णालयत जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या तपासण्या होणार आहे. तपासण्यांनंतरच शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होत आहे. हा त्रास अधिक बळावू नये यासाठी H N रिलायंन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सूचवला आहे.
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला आहे. पण शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार होती. मात्र त्यांनी सध्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतलेला आहे.