CNG चा भडका, भाडेवाढ मागतोय टॅक्सिवाला

मुंबईकरांना बसणार टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीचा फटका?

Updated: Jul 14, 2022, 07:39 PM IST
CNG चा भडका, भाडेवाढ मागतोय टॅक्सिवाला title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करत शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातल्या जनतेला मोठा दिलास आहे. पण दुसरीकडे रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा भार मुंबईकरांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सीएनजी (CNG) दरात झालेल्या दरवाढीचं कारण देत मुंबईत टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने सरकारकडे केली आहे. 

वाढती महागाई, वाढणारे इंधनाचे दर यामुळे टॅक्सी चालक त्रस्त आहेत. शिवाय गेल्या सात ते आठ महिन्यात सतत सीएनजीचे दर वाढल्याने टॅक्सी चालकांना व्यवसाय करणं अवघड झालं आहे अशी प्रतिक्रिया टॅक्सी चालकांची आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा  आणि टॅक्सी चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी टॅक्सी चालक आणि युनियनची आहे.

पहिल्या दीड किलोमीटर साठी टॅक्सीचे भाडे 35 रुपये करण्यात यावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियन ची आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटर साठी 25 रुपये टॅक्सी भाडे आहे, यात दहा रुपयांनी वाढ मिळावी अशी मागणी टॅक्सीमेन्स युनियनची मागणी आहे. सीएनजी सध्या प्रति किलो ८० रुपये आहे. 

टॅक्सी चालकांना भाडेवाढ ठरवण्यासाठी शासनाने खटुवा समिती नेमली आहे या खटवा समितीच्या शिफारशीनुसार टॅक्सी चालकांना भाडेवाढ मिळणार आहे. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी चालकांना ही भाडेवाढ मिळू शकते मात्र किती रुपयांपर्यंत ही भाडे वाढ मिळेल याबाबत निश्चिती नाहीय.

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसाठी इंधनाचे वाढत जाणारे दर आणि त्यामागे प्रति किलोमीटर येणारा खर्च, वाहनाचा देखभाल दुरुस्ती खर्च, नवीन रिक्षा आणि टॅक्सीची किंमत, वार्षिक घसारा, वार्षिक विमा, प्रति वर्ष मोटर वाहन कर, वार्षिक लायसन्स नूतनीकरण शुल्क, प्रति वर्ष परवाना नूतनीकरण शुल्क, उपजीविकेचा वार्षिक खर्च लक्षात घेऊन भाडेसूत्रानुसार दर निश्चित केले जातात.