मुंबई : आरे कारशेडला पर्यायी जागा सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कारशेडसाठी आरेमधील जागेऐवजी पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आणि वाजवी किंमतीत पर्यायी जागा उपलब्ध आहे का ? याचा समिती अभ्यास करणार आहे. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आरे कॉलनीतील जमिनीच्या पर्यावरण रक्षणासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबतही समिती अभ्यास करणार आहे. येत्या पंधरा दिवसात समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
मेट्रो ३ च्या आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मेट्रो कारशेडला भेट देवून पाहणी करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडं कुलाब्याचे आमदार राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.
मेट्रो कारशेड कामाला दिलेल्या स्थगितीवरून आता शिवसेना भाजपमध्ये राजकारण सुरु झालं आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून कारशेड कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर याचा परिणाम संपूर्ण मेट्रो प्रकल्पावर होणार असल्याचं भाजपकडून सांगितलं जातं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून आरे इथं मेट्रो कारशेड उभारणीला हिरवा कंदील दर्शवला होता.