मुंबई: औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी शनिवारी आपण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार यांच्यात बराचकाळ चर्चा झाली. त्यामुळे आता सत्तार भाजपमध्ये जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असे झाल्यास हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का असेल. तसेच सत्तार भाजपच्या गळाला लागल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्षाला त्याचा विशेष फायदा होऊ शकतो.
गेल्या २० वर्षांपासून अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष आणि स्थानिक राजकारणात सत्तार यांचे चांगलेच वजन आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीतही मोदी लाट असूनही अब्दुल सत्तार निवडून आले होते. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधील काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल साडेतीन लाख मते मिळाली होती. यावेळी अब्दुल सत्तार यांनीच काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद किंवा जालन्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने झांबड यांना उमेदवारी देऊ केल्यामुळे सत्तार नाराज झाले. हा निर्णय घेताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतले नाही. परिणामी मी अपक्ष लढणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले होते.