रूफ टॉप हॉटेल परवानगीवरून नवा वाद

मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांमध्ये रुफ टॉप हॉटेलला परवानगी दिली असली तरी यानिमित्ताने एक नवा वाद समोर आला आहे.

Updated: Nov 3, 2017, 08:53 AM IST
रूफ टॉप हॉटेल परवानगीवरून नवा वाद title=

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांमध्ये रुफ टॉप हॉटेलला परवानगी दिली असली तरी यानिमित्ताने एक नवा वाद समोर आला आहे.

सभागृहाचे अधिकार डावलून आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रकार म्हणजे सभागृहाचा अवमान करणारा असल्याचे मत पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे या निर्णयावर पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबईतील व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव सुधार समितीमध्ये नामंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव पालिका सभागृहात तरी पास व्हावा, यासाठी सत्ताधारी शिवसेना प्रयत्नशील होती. पण बहुमतासाठी संख्याबळाचे गणित जमत नसल्याने अखेर यासंदर्भात नवा मसुदा बनवून तो थेट आयुक्तांकरवी शिवसेनेने मंजूर करवून घेतला आहे. 

नव्याने मसूदा बनवून सदर धोरणास मंजूरी देणे बेकायदा असून पालिका अधिनियमांना धरून नसल्याची टीका काँग्रेसनं केलीय. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांमध्ये याला मंजुरी दिल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत केले.

दरम्यान, मुंबईतल्या हॉटेल आणि मॉल इमारतींच्या छतावरील हॉटेल्सला मंजुरी देण्यात आलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. केवळ व्यावसायिक इमारतींवरच्या छतावरच हॉटेल्स सुरू करता येणार आहेत. मात्र, यासाठी आजूबाजूला १० मीटर अंतरावर रहिवासी इमारत नसणं बंधनकारक असणार आहे. तसंच मॉल आणि लॉजिंग भागातल्या छतावरील हॉटेल्सना परवानगी देण्यात आलीय. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळं शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय.