महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत सहभागी होणार

 शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Updated: Nov 12, 2019, 07:39 PM IST
महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत सहभागी होणार
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किमान समान कार्यक्रमावर काँग्रेसचा भर आहे. त्यानंतर काँग्रेस सत्तेत सहभागी होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सत्तेत सहभागी होण्याबाबत विचारविनिमय झाला. आता काँग्रेसचे नेते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना या बैठकीतील निर्णय सांगणार आहेत. त्यानंतर पुढील दिशा पुढे होणार आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला होता. मात्र, त्यांना १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करता आले नाही. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती शिफारस लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून ही तिसरी वेळ आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. किमान समान कार्यक्रमावर आधारित आघाडी तयार करण्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले आहे. तर यूपी-बिहारींना विरोध करण्यांसोबत कसं जायचे, शिवराज पाटील चाकूरकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.