Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : शिवसेना कुणाची हे जनतेच्या न्यायालयात ठरेल असं सांगत उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली. जनतेच्या मनात काय होतं हे उद्धव ठाकरेंच्या लक्षातच आलं नाही. विधानसभा निवडणूक निकालात एकनाथ शिंदेंनी विजय मिळवत शिवसेनेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला. विधानसभा निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तब्बल 57 आमदार निवडून आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिलेला शब्द खरा ठरवलाय. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेला भरघोस यश मिळवून दिलंय. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी हा आकडा पन्नासच्या वर नेलाय. आपण जे बोललो होतो ते करुन दाखवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडून आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी 40 आमदार फोडले. त्यानंतर यापैकीच्या एकाही आमदाराला जिंकू देणार नसल्याच्या डरकाळ्या ठाकरेंनी अनेकदा फोडल्या. प्रत्यक्षात मात्र, या निवडणुकीत शिंदेंनी केवळ माहीममधील सदा सरवणकर वगळता साऱ्यांनाच निवडून आणले आहे. एवढेच नाही. तर शिंदेनी आपल्याकडे संख्या टिकवून ते दीड डझनांनी वाढवली आहे. म्हणजे, शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या असून, त्यांच्या तब्बल 17 जागा वाढल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीत शिंदेंच्या सेनेला 85 जागा मिळाल्या होत्या. या सगळ्याच जागा जिंकून आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखवण्यासाठी शिंदेंनी आपली मोहीम राबवली होती.
शहाजीबापू पाटील, सदा सरवणकर, यामिनी जाधव असे त्यांचे काही शिलेदार पराभूत झाले. पण बहुतांश आमदार त्यांनी पुन्हा निवडून आणले. एकनाथ शिंदेंनी आपली राजकीय ताकद दाखवून दिलीय. शिवसेना कुणाची हे या विजयानं स्पष्ट झाल्याचा टोला शिवसेना प्रवक्त संजय शिरसाट यांनी लगावलाय. एकनाथ शिंदेंनी या निवडणुकीतून त्यांचं राजकीय कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करुन दाखवलंय. या विजयानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालंय.