राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे.  

Updated: Jun 4, 2020, 06:54 AM IST
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर title=
संग्रहित छाया

मुंबई : एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे. देशात सर्वाधिक रूग्ण राज्यात असल्यामुळे कोरोनाचा प्रसार राज्यात कमी होणं गरजेचं होतं. गेल्या ७ दिवसांत राज्याचा सीडीजीआर म्हणजे रग्णवाढीची आकडेवारी ४.१५ टक्के होती. तर देशाचा सीडीजीआर ४.७४ टक्के होता. रूग्णसंख्या दुप्पट होण्याची आकडेवारीही १७.३५ दिवसांवर आली आहे. 

 देशात हीच आकडेवारी १५.१८ दिवस इतकी आहे. मे महिन्याच्या मध्यावधीत राज्यात ६.५ टक्के ते ७ टक्क्यांनी रूग्णसंख्या दरदिवशी वाढत होती. मात्र आता देश आणि राज्याची आकडेवारी कमी होत आहे. या आकडेवारीचा अर्थ आमच्या प्रेक्षकांनी लक्षात घ्या. दर कमी होणं म्हणजे कोरोनाचा प्रसार थांबला असा होत नाही. रूग्ण अजूनही मिळणारच आहेत. पण आता कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग कमी झालाय हे ही संख्या दर्शवते. राज्यातील मृत्यूदर ३.३७ टक्के आहे.

राज्यात काल ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि.१ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

राज्यात १२२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ६० (मुंबई ४९, उल्हासनगर ३, ठाणे २, नवी मुंबई ३, वसई विरार १, भिवंडी १, मीरा भाईंदर- १), नाशिक- ८ ( धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदूरबार १), पुणे- २९ (पुणे १९, सोलापूर १०), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-१७ (औरंगाबाद मनपा १६, जालना १), लातूर- १ (उस्मानाबाद १), अकोला-२ (अकोला २), इतर राज्ये-३ (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.)

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५८७ झाली आहे.