मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि नगर पालिका निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याची शिफारस निवडणूक आयोगाला केल्या आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
शहरी, ग्रामीण भागातील सगळ्या शाळा, कॉलेज बंद करण्यात येणार आङेत. तसंच सगळ्या परीक्षाही पुढे ढकलल्या जाणार आहेत, असं राजेश टोपेंनी सांगितलं. १०वी आणि १२वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच पुणेकरांनी विशेष काळजी घ्यायचं आवाहन राजेश टोपेंनी केलं आहे. मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश देणं बंद करण्यात आल्याची माहिती टोपेंनी दिली.
कोरोनामुळे सरकारी कार्यालयांमधल्या बायोमेट्रिक प्रणालीचा वापरही बंद करण्यात आला आहे. पुढचे आदेश येईपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना मस्टरवर त्यांची हजेरी लावावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.