मुंबईवर कोरोनाची टांगती तलवार, सरकार किती गंभीर?

मुंबईत जर कोरोना पसरला तर परिस्थिती हाताबाहेर जावू शकते याचं गांभिर्य सरकारला अजून आलेलं नाही का?

Updated: Mar 16, 2020, 04:01 PM IST
मुंबईवर कोरोनाची टांगती तलवार, सरकार किती गंभीर? title=

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. पण मुंबईतली गर्दी काही कमी झालेली नाही. लाखो मुंबईकर आजही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सरकार गर्दी करु नका असं सांगतेय खरं. पण दुसरीकडं खासगी कंपन्यांची कार्यालयं सुरुच आहेत. त्यामुळं नाईलाजाने लोकांना कामावर जावं लागत आहे. त्यामुळे मुंबईतली गर्दी या महामारीतही कायम आहे. इतर देश ज्या प्रकारे कोरोनाबाबत उपाययोजना करत आहे. तशी स्थिती महाराष्ट्रात खासकरुन मुंबईत दिसून येत नाहीये त्यामुळे कोरोनाबाबत सरकार गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईतली गर्दी कमी करण्यावर उपाययोजना का नाही? सरकारच्या फक्त घोषणा पण अंमलबजावणीच्या नावानं बोंब अशी स्थिती आहे. सरकार एकीकडं खासगी कंपन्यांना कोणतेही आदेश द्यायला तयार नाही. पण मुंबईकरांना मात्र एकमेकात सुरक्षित अंतर ठेवा असा सल्ला देत आहे. मुंबईत रोज लाखो चाकरमान जीव हातात घेऊन प्रवास करत असतात. पण आता या महामारीपुढे ही चाकरमान्यांपुढे जीव मुठीत घेऊन कामाला जाण्य़ाशिवाय काहीही पर्य़ाय दिसत नाही. कामाला गेलो तरच संध्याकाळची चूल पेटेल अशी स्थिती मुंबईत कामासाठी य़ेणाऱ्या अनेकांची आहे. त्यामुळे कार्यालय सुरु असल्याने त्यांना यावच लागतं.

पण मुंबईत तर कोरोना पसरला तर किती भंयकर परिस्थिती निर्माण होईल याचं गांभिर्य अजून ही सरकारला आलं नसावं. मुंबईच्या लोकलमध्ये ज्या प्रकारे लोकं गर्दीत प्रवास करतात. ते पाहता मुंबईत जर कोरोना आला तर मुंबईत मोठा हाहाकार माजू शकतो. आणि परिस्थिती हाताच्या बाहेर जावू शकते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. 

इटलीमध्ये एकाच दिवसात ३६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र देशात याबाबतीत पहिल्य़ा स्थानावर आहे. कोरोनाच्या रग्णांची संख्या आज ३७ वर गेली आहे. आज नवे ४ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत.