मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक राज्य जिथे लॉक डाऊन करण्यात आली तिथे मुंबईतून एक आनंदवार्ता समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित असलेले १२ रूग्ण बरे झाले आहेत. लवकरच या रूग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. या बातमीने सगळ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कस्तुरबा रूग्णालयात कोरोनाग्रस्त १२ रूग्णांना दाखल करण्यात आलं होतं. यांना योग्य ते उपचार मिळाल्यानंतर पुन्हा या १२ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यांचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले असून हे १२ रूग्ण कोरोना फ्री झाले आहेत. आता लवकर यांनी डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्त रूग्णांनी शंभरचा आकडा पार केला आहे. १०१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना ही खरंच दिलासा देणारी बातमी म्हटली तरी हरकत नाही. कोरोनाबाधित रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही काही दिवस निरिक्षणाखाली हे रूग्ण राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात एका बाजूला कोरोनाचा रूग्ण बरा होताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत राज्यात शंभरीचा आकडा पार केला असून १०१ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात आतापर्यंत ४७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.