बाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा - प्रकाश आंबेडकर

कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिकरित्या जयंती साजरी होणारी नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Updated: Apr 7, 2020, 03:06 PM IST
बाबासाहेबांची जयंती घरीच साजरी करा - प्रकाश आंबेडकर  title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. सरकारकडून सतत लोकांनी एकत्रित न येण्याचं, कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जनतेला आवाहन केलं आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीत साजरी करण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करु नका. जयंती आपापल्या घरीच साजरी करा. त्याचे फोटो सोशल मीडियावरुन टाका आणि एकमेकांच्या संपर्कात राहा. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिकरित्या जयंती साजरी होणारी नाही याची काळजी घेण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

त्याशिवाय, जयंतीसाठी जमा केलेला निधी, लॉकडाऊन काळात अडचणीत असणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या गरजूंच्या मदतीसाठी वापरण्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

देशभरासह राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4500वर पोहचला आहे. तर आतापर्यंत देशात 130हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 868वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 52वर गेला आहे. केवळ मुंबईत कोरोनाचे 526 रुग्ण आढळले आहेत. 

देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारंवार सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात येत आहेत.