Coronavirus Lockdown: वसईत टवाळखोर दुचाकीस्वारांनी पोलिसाला उडवले; प्रकृती गंभीर

रिकामटेकड्या लोकांना पोलिसांनी कालपासून काठीने फटकावयला सुरुवात केली आहे.

Updated: Mar 25, 2020, 03:34 PM IST
Coronavirus Lockdown: वसईत टवाळखोर दुचाकीस्वारांनी पोलिसाला उडवले; प्रकृती गंभीर title=

मुंबई: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा होऊनही नागरिक गांभीर्याने वागायला तयार नाहीत. एवढेच काय सुट्टी असल्यामुळे घरात बसून असलेले अनेकजण कोरोनाचा धोका लक्षात न घेता रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत आहेत. अशा या रिकामटेकड्या लोकांना पोलिसांनी कालपासून काठीने फटकावयला सुरुवात केली होती. विनाकारण रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी फिरवणाऱ्यांना पोलिसांकडून फटके मिळत असतानाचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

मात्र, वसईत बुधवारी एका टवाळखोर दुचाकीस्वाराने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी चढवल्याची घटना घडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील गंभीर जखमी झाले आहेत. सुनील पाटील वसईच्या वाकनपाडा परिसरात बंदोबस्तावर होते. यावेळी काही टवाळखोर तरूण रस्त्यावर दुचाकी फिरवत होते. या तरुणांना पोलीस पकडायला गेल्यावर हे तरुण दुचाकीस्वार पळ काढत होते. त्यावेळी सुनील पाटील एका दुचाकीसमोर उभे राहिले. या दुचाकीस्वाराने कोणतीही पर्वा न करता भरधाव वेगातील दुचाकी सुनील पाटील यांच्या अंगावर चढवली. त्यामुळे सुनील पाटील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या वसईच्या आयसीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. येत्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात घरातून बाहेर पडण्याचा साधा विचारही करू नये, असे आवाहन मोदींनी केले होते. राज्यातही सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र, यानंतरही नागरिक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. या सगळ्याला पोलिसांनी मज्जाव केल्यास अनेक नागरिक त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसत आहेत.