कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातील मृतदेहांची अवहेलना- मनसे

पाच मृतदेह हे घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात येणाऱ्या पिशव्यांच्या सहाय्याने सीलबंद करण्यात आले.

Updated: Apr 24, 2020, 05:32 PM IST
कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातील मृतदेहांची अवहेलना- मनसे title=

मुंबई: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) भीतीमुळे मुंबईच्या केईएम आणि कूपर रुग्णालयातील मृतांची अवहेलना होत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे. शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात शालिनी ठाकरे यांनी केईएम रुग्णालयात घडलेला प्रसंग नमूद केला आहे. 

केईएम रुग्णालयात रविवारी कोव्हिड कक्षामध्ये मृत्यू झालेल्या दहा जणांचे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात जागा नव्हती. त्यामुळे हे मृतदेह रुग्णालयाच्या २० क्रमांकाच्या कोव्हिड कक्षामध्येच ठेवण्यात आले. सोमवारी सायंकाळी यापैकी पाच मृतदेहांसाठी विशेष किटची व्यवस्था करण्यात आली, तर उर्वरित पाच मृतदेह हे घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात येणाऱ्या पिशव्यांच्या सहाय्याने सीलबंद करण्यात आल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वॉर्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण

तर कूपर रुग्णालयात कोरोना संशयित असलेल्या रुग्णांचे मृतदेह १२ तास पडून होते. बुधवारी सकाळी कूपरमध्ये दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण कोरोना संशयित असल्यामुळे त्यांच्या मृतदेहाजवळ जायला कुणी धजावत नव्हते. आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारला असता रुग्णालयात सध्या एकच चतुर्थश्रेणी कामगार कार्यरत असल्याचे अधिष्ठात्यांनी सांगितल्याचे शालिनी ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. 
याशिवाय, कोरोनाच्या धास्तीने अनेक खासगी रुग्णालये सामान्य रुग्णांवरही उपचार करायला नकार देत आहेत. यामुळे नवी मुंबईतील ह्रदयविकाराचा झटका आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतरही संबंधित महिला कोरोनाबाधित आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी तीन दिवस लागले. 

...आणि कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा न करताच डॉक्टरांनी वाचवला शेतकऱ्याचा जीव

सध्याच्या परिस्थितीमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. मात्र, प्रशासनाने या सगळ्यात लक्ष घालून मृतदेहांची अवहेलना थांबवावी. तसेच रुग्णांना नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.