मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे. असे असताना दिल्लीत धार्मिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला १८०० पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. त्यातील काहींना कोरोना झाला तर काहींचा मृत्यू झाला. दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिग समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम कोरोनाचा फैलाव पोहोचविण्यास कारणीभूत ठरला आहे. धार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा ‘नजराणा’ पेश केला आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेना आपल्या 'सामना' या मुखपत्रातून केली आहे. देशात लॉकडाऊन असताना असा कार्यक्रम घेतला कसा, असा प्रश्न उपस्थित करत यावरुन शिवसेनेना जोरदार टीका केली आहे.
‘मरकज’निमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची आणि समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले. एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना ‘इस्लाम’च्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद केल्या आहेत. लोकांनी घरच्या घरीच नमाज पठण करावे, असे फर्मान तेथील राज्यकर्त्यांनी काढले आहे. असे असताना आपल्या देशात काय चालले आहे आणि आपण काय करत आहोत, याचे भान आहे का, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.
मुसलमान समाजात जागरुकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला ‘मरकज’सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱ्यांना आयतेच कोलीत दिले आहे. मुसलमानांनी निदान ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यावे, अशी जोरदार टीका शिवसेनेने केली आहे.
संपूर्ण देशात कोरोनाच्या भीतीने लोक घरात बसले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आदेशाने ‘लॉक डाऊन’ झाला आहे. पण दिल्लीच्या निजामुद्दीन येथे जमलेल्या मुसलमान झुंडीने देशावरील संकटात आणि चिंतेत भर टाकली आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
तबलिग समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम १ ते १५ मार्चच्या दरम्यान झाला. या कार्यक्रमासाठी देशातील २२ राज्यांमधून आणि जगातील ८ देशांतून ५ हजारांवर लोक जमले होते. त्यातील ३८० लोक आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. देशात हडकंप माजला आहे. या ५ हजारांच्या जमावात २ हजार परदेशी नागरिक होते. सारा देश कोरोनाच्या चिंतेने ग्रासला असताना, दिल्लीसारख्या शहरात ‘गर्दी’ आणि ‘झुंडी’ जमा करण्यावर निर्बंध लादलेले असताना ५ हजार लोक धर्माच्या नावाखाली जमले त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम अखेर झाला. हा प्रकार बेफिकीरी आणि धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे.
‘मरकज’निमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची आणि समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले. एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना ‘इस्लाम’च्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद केल्या आहेत. मग देशात असे का होत नाही. काय आहे हा प्रकार, असा सवालही उपस्थित केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे ‘मरकज’ही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा आहे आणि मुसलमान समाजातील लोकही या कारवाईच्या मागे ठामपणे उभे राहिले असते. ‘मरकज’साठी आलेल्या बेपर्वा तबलिगनी आपापल्या राज्यांत परतताना ५ रेल्वे गाड्यांनी प्रवास केला. त्यातील काही लोक महाराष्ट्रातही आले. म्हणजे गाडीतील असंख्य लोकांना त्यांनी विनाकारण संकटात टाकले. खरे तर जे ‘मरकज’ला गेले त्यांनी स्वत:हूनच पुढे यायला हवे. त्यात लपविण्यासारखे काय आहे?