डॉक्टरांच्या सल्ल्याविना करता येणार कोरोना टेस्ट

संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्तींना चाचणी निगेटिव्ह आल्यावरच मिळणार 'डिस्चार्ज'

Updated: Jul 7, 2020, 07:58 PM IST
डॉक्टरांच्या सल्ल्याविना करता येणार कोरोना टेस्ट
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी महापालिकेद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत. याच धर्तीवर या आजाराचे लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार सुरु करणे शक्य झाल्याने संबंधित रुग्ण लवकर बरा होण्याची संभाव्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची खाजगी प्रयोगशाळांची वाढलेली संख्या आणि क्षमता लक्षात घेत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांच्या 'प्रिस्क्रीप्शन' शिवाय कोविड चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला आहे. 

आयुक्यांकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या धर्तीवर आता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील निर्धारित खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोवीड विषयक चाचणी ही थेट संपर्क साधून करवून घेता येणार आहे. यानुसार खाजगी प्रयोगशाळांमधून चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील १७ खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना कोविड चाचणी करण्याची परवानगी केंद्रशासनाद्वारे देण्यात आली आहे. यानुसार निर्धारित करण्यात आलेल्या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी यापूर्वी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे होते. मात्र ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांची कोवीड विषयक चाचणी सहजपणे करवून घेणे शक्य होणार आहे. सदर चाचणी पॉजिटीव्ह आल्यास महापालिकेच्या विभागस्तरीय 'वॉर रुम'द्वारे बेड अलॉअमेंट करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होणार आहे.

 

वरीलनुसार महापालिका क्षेत्रातील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून कोवीड विषयक चाचणी करण्यासाठी शासनाने यापूर्वी लागू केलेल्या निर्धारित दरांनुसार प्रती चाचणी रुपये २ हजार ५०० एवढे शुल्क आकारले जाणार आहे. तर, चाचणीसाठी व्यक्तीचे नमुने घरी जाऊन घेतल्यास त्यासाठी प्रती चाचणी २ हजार ८०० रुपये आकारले जाणार आहेत. 

संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांसाठी नियम 

संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची कोविड चाचणी निगेटीव्ह असणं गरजेचं असेल, असंही महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 

चाचणीसाठीची परवानगी देण्यात आलेल्या प्रयोगशाळा खालीलप्रमाणे 

Thyrocare

Suburban

HN Reliance 

Metropolice 

SRL

Infexn

Koilaben 

SRL Phadke 

IGENETICS 

PD Hinduja 

Qualilife Diagnostics 

DR. Jariwala 

Nanavati Hospital 

Sunflower 

NM Medical 

Jaslok 

Life Care Diagnostic