Corona Vaccination - मुंबईत उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस, बोगस लसीकरण रोखण्यासाठी भरारी पथक

वेगान लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचा प्लान तयार

Updated: Jun 20, 2021, 06:10 PM IST
Corona Vaccination - मुंबईत उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस, बोगस लसीकरण रोखण्यासाठी भरारी पथक

मुंबई : मुंबईत पूर्वनोंदणी केलेल्या ३० ते ४४ वयोगटाचं लसीकरण दहा केंद्रांवर खुलं करण्यात आलं होतं. आता उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस घेता येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन रांगा लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील पालिकेच्या केंद्रावर सोमवार ते बुधवार ४५ वर्षांवरील नागरिकांचे पूर्वनोंदणीशिवाय आणि गुरुवार ते शनिवार पूर्वनोंदणी करूनच लसीकरण केलं जाते. यात आता ३० ते ४४ वयोगटाचाही समावेश करण्यात आलाय. 

लसीकरणासाठी मुंबई मनपाचा अ‍ॅक्शन प्लॅन
मुंबईत व्यवसायानुसार लसीकरण करण्याची योजना मुंबई मनपाने तयार केलीय. मुंबईत टप्पे पाडून लसीकरण केले जाईल. विशेष करून सुपरस्प्रेडरना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. व्यवसायानुसार सुपर स्प्रेडर गट जसे- फेरीवाले , रिक्षाचालक यांचं लसीकरण करण्याला प्राधान्य दिलं जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईत 227 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. आरोग्य शिबीरासारखे लसीकरण सुरू करू. तसंच राहत्या घरापासून जवळ नागरिकांना लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचंही किशोरी पेडणकेर यांनी सांगितलं.

बोगस लसीकरण रोखण्यासाठी भरारी पथकं
मुंबईतल्या कांदिवलीमधल्या बेकायदा लसीकरणप्रानंतर पालिका सावध झाली आहे. बोगस लसीकरण रोखण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात दोन भरारी पथकं नेमण्यात आली असल्याची माहितीही महापौरांनी दिली. मुंबई महापालिकेने सीरम इन्स्टिट्यूटला पत्र लिहिलं आहे. त्यानुसार सीरम कुपीतल्या व्हॅक्सिनची पडताळणी करणार आहे. हिरानंदानी सोसायटीत देण्यात आलेल्या लशींची एक कुपी सीरमकडे पाठवण्यात आली असून, ती लसच आहे का? याची खात्री करून घेतली जात आहे. याप्रकरणी पोलीस आणि महापालिका चौकशी करत असल्याची माहिती महापौरांनी दिली.