मुंबईवर सायबर अटॅक, ऑक्टोबरमधील ब्लॅकआऊट चीनचा कट

भारतातील वीज यंत्रणा चीनच्या निशाण्यावर

Updated: Mar 1, 2021, 06:26 PM IST
मुंबईवर सायबर अटॅक, ऑक्टोबरमधील ब्लॅकआऊट चीनचा कट title=

मुंबई : गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत अनेक तास वीज गायब होती. ऑक्टोबर 2020मध्ये झालेल्या त्या ब्लॅकआऊट प्रकरणी न्यूयॉर्क टाइम्सनं धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. चीननं सायबर हल्ला करून मुंबई अंधारात बुडवली, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

भारतातील वीज यंत्रणा चीनच्या निशाण्यावर?

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जी शक्यता वर्तवली होती, ती अखेर खरी ठरली आहे. गेल्यावर्षी 12 ऑक्टोबर 2020 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अंधारात बुडाली. एकाच वेळी अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्यानं एकच खळबळ उडाली. कोरोना काळात रुग्णालयातली व्हेंटिलेटर्स चालवण्यासाठी आपत्कालिन जनरेटर्सची मदत घ्यावी लागली. लाईफलाईन असलेली रेल्वे लोकलसेवाही काही काळासाठी ठप्प झाली.तब्बल 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईतला वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला.

मुंबईतला हा ब्लॅकआऊट चीनचा कट असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट न्यूयॉर्क टाइम्सनं केला आहे. चीनमधील रेडइको नावाच्या ग्रुपनं भारतातील वीजनिर्मिती प्रकल्पांवर हा सायबर अटॅक केला होता. भारताच्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये चिनी मॅलवेअर सक्रीय करण्यात आलं, असा गौप्यस्फोट रेकॉर्डेट फ्युचर या अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनीच्या हवाल्यानं करण्यात आलाय. लडाख सीमेवर गलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली. त्याचा बदला म्हणून चीननं हा सायबर हल्ला केला, असं न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातील पॉवर ग्रीडवर सायबर अटॅक झाल्याच्या या वृत्ताची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याबाबत तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला दिले आहेत.

मुंबईसह देशातली प्रमुख शहरं अंधारात बुडवण्याचा हा चिनी कट आता उघड झालाय... सीमेवर दादागिरी करणारा चीन आता भारतीय शहरांवर सायबर अटॅक करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात आहे, हे यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे.