मुंबई : लॉकडाऊनला विरोध करणा-यांना मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रस्त्यावर उतरुन लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची आमची तयारी आहे. मात्र तुलना केवळ परिस्थितीशी करु नका सरकारच्या कृतीचीही करा असं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर येत्या 2 दिवसात परिस्थिती बदलली नाही तरी लॉकडाऊनचा इशारा दिला. त्याचबरोबर त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या विरोधकांनाही चिमटे काढले.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यासाठी त्यांनी इतर देशांनी केलेल्या उपायोजनांचे दाखलेही दिले. 'केवळ विरोधक तसंच तज्ज्ञांचा दुस्वास करुन कोरोना जाणार नाही तर प्रत्यक्षात काय करतो याचं प्रबोधनात्मक विवेचन केल्यास अधिक फरक पडेल' असं फडणवीस म्हणालेत
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत...
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची...