दोस्त दोस्त ना रहा.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचे दिसून आले.

Updated: Nov 28, 2019, 07:43 PM IST
दोस्त दोस्त ना रहा.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा न देताच फडणवीस माघारी title=

मुंबई: शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. या सोहळ्याला देशातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. इतकेच नव्हे शिवसेनेचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी चंद्रकांत पाटील हेदेखील होते. मात्र, शपथविधी सोहळ्यानंतर या दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच काढता पाय घेतला. 

उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सहा मंत्र्यांनाही यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी संपन्न झाल्यानंतर मनातील कटुता बाजूला ठेवून व्यासपीठावर उपस्थित असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. त्यांच्यापाठोपाठ अन्य नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यावेळी व्यासपीठावर दिसून आले नाहीत. अधिक चौकशी केली असता हे दोन्ही नेते शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर तातडीने बाहेर पडल्याचे समजले. 

शिवसेना आणि भाजप यांनी युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. याची परिणती युती तुटण्यात झाली होती. एकीकडे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साहाय्याने सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरु केले. तेव्हाच भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना फोडत सरकार स्थापन केले होते. मात्र, संख्याबळाची जुळवाजुळव न करू शकल्याने अवघ्या चार दिवसांमध्ये फडणवीस सरकार कोसळले होते. यानंतर महाविकासआघाडीने राज्यपालांकडे रीतसर सत्तास्थापनेचा दावा केला. अखेर आज महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.