मुंबई : राज्यात घोषित केलेली मेगा भरती तात्काळ सुरू केली जाणार आहे. जी मराठा आरक्षणामुळे थांबली होती. ७२ हजार पदांची सरकारी मेगाभरती तात्काळ सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यामुळे मराठा समाजातील तरूणांचा नोकरीचा राजमार्ग खुला होणार आहे.
मराठा आरक्षण विधेयकाला अखेर कायद्याचं स्वरूप प्राप्त झालंय. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केलीय. त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालंय. राज्यपालांच्या स्वाक्षरीमुळे मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आलाय. मराठा आरक्षण विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमतानं चर्चेविनाच मंजूर करण्यात आलं होतं.
सर्वपक्षांनी या विधेयकाला एकमुखी पाठिंबा दिला होता. त्यानंतर हे विधेय़क राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं. आता या विधेयकाला कायद्याचं स्वरूप आल्यानं मराठा आरक्षणाची अधिसूचना काढण्याचा मार्ग मोकळा झालाय. या कायद्याची अधिसूचना सोमवारी काढण्यात येणार आहे.