अहमदनगर : महाविकासआघाडीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. तसेच राज्यात लवकरच भाजप सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस करतील. असा दावा ही त्यांनी केलाय.
2019 मध्ये राज्यात जनतेने मोदीजींच्या नेतृत्वाला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाला विधानसभेतील जनाधार भाजपला दिला. हे महाविकासआघाडी सरकार विश्वासघाताने तयार झालं आणि आज तेच विश्वासघाताची भाषण करतात त्यांनाही शोभत नाही. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून आंदोलन होत आहेत. तर शिंदे समर्थक ही रस्त्यावर उतरुन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनवर पोहोचले आहेत. त्य़ामुळे लवकरच राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे. सत्तेचा फॉर्म्युला देखील ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजप कशाप्रकारे सत्तास्थापनेचा दावा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.