आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन

 शांततेने पार पडलेल्या या आंदोलनात बंद, चक्का जाम, ठिय्या, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर घोषणाबाजी असे आंदोलनाचे स्वरूप होते.

Updated: Aug 14, 2018, 03:46 PM IST
आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन title=

मुंबई: गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेला धनगर समाज आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर समाजातील सर्वच समाज आपापल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे धनगर समाजानेही आपली मागणी लावून धरत राज्यभरात आंदोलन छेडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनात धनगर समाज बांधवांनी राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलने केली. शांततेने पार पडलेल्या या आंदोलनात बंद, चक्का जाम, ठिय्या, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर घोषणाबाजी असे आंदोलनाचे स्वरूप होते.

बीड जिल्ह्यात युवा मल्हार सेनेच्या वतीनं चक्का जाम

बीड जिल्ह्यात युवा मल्हार सेनेच्या वतीनं बारा ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक तासभर रोखून चक्का जाम आंदोलन केलं. दरम्यान, यावेळी सरकारविरोधी घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव, उमापूर, गेवराई आणि धारूर या ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

नाशिक जिल्हयातील मोर्चा काढून रस्ता रोको 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी नाशिक जिल्हयातील नांदगावमध्ये मोर्चा काढून रस्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती देण्यात यावी, मेंढपाळांना त्रास देणा-या वनविभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करावे,सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोत अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं अशा विविध मागण्यांसाठी मालेगाव-नांदगाव मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला.

अलिबागमध्ये धनगर समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबागमध्ये धनगर समाजाकडून जिल्‍हा परीषद कार्यालय ते जिल्‍हाधिकारी कार्यालय असा मार्चा काढण्‍यात आला. हातात पिवळे झेंडे घेवून निघालेले आंदोलक आपल्‍या मागण्‍यांबरोबरच सरकारविरोधी घोषणाबाजी करत होते.  हिराकोट तलावाजवळ पोलीसांनी मोर्चा अडवल्‍यानंतर आंदोलकांच्‍या शिष्‍टमंडळानं जिल्‍हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्‍याचं निवेदन सादर केलं.

यवतमाळमध्ये चक्काजाम

धनगर जमातीच्या आरक्षणाचं आश्वासन देऊनही अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ धनगर समाज संघर्ष समितीनं यवतमाळमध्ये चक्काजाम आंदोलन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यतिथी कार्यक्रम बसस्थानक चौकात रस्त्यावर केल्यानंतर संतप्त धनगर बांधवांनी चक्काजाम आंदोलन करत नागपूर तुळजापूर राज्यमार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे बराचवेळ शहरातील वाहतूक खोळंबली.

सांगली येथे ठिय्या आंदोलन 

आरक्षणाच्या मागणीसाठी  धनगर समाजातर्फे सांगलीत ठिय्या आंदोलन करण्यात आल. सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर झालेल्या आंदोलनात शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. धनगर आरक्षणाचा प्रश्न महिनाभरात सोडवावा अन्यथा राज्यात निर्माण होणा-या परीस्थितीला सरकार जबाबदार राहील, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आंदोलनाच नेतृत्व केले.

अकोला जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्या घेऊन आंदोलन

आरक्षणाच्या मागणीसाठी अकोला जिल्यातील बोरगावमध्ये धनगर समाजाच्यावतीनं शेळ्या-मेंढ्या घेऊन आंदोलन करण्यात आलं. बोरगावमधून मुंबई नागपूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आनंदलोकांनी आर्धा तास रोखून ठेवला होता. जय मल्हारचे नारे देत आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. शेकडो धनगर समाज बांधव आपल्या मागण्यासाठी शेळी-मेंढ्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

नांदेड-लातूर रोडवर  मेंढरं सोडून रास्तारोको 

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला... नांदेड लातूर रोडवर लोहा येथे मेंढरं सोडून रास्तारोको करण्यात आला... नायगाव इथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती... तर नांदेड हैदराबाद रोडवर नायगाव चौकात रास्तारोकोही करण्यात आला... तब्बल तासभर पूर्ण वाहतूक ठप्प होती... धर्माबाद, बिलोली, देगलूर येथेही मुख्य चौकांमध्ये रास्तारोको करण्यात आला... 

अक्कलकोट येथे शहरातून मोटारसायकल रॅली

सोलापूरच्या अक्कलकोट इथे हजारो धनगर बांधवानी धनगर आरक्षण मिळावे यासाठी शहरातून मोटारसायकल रॅली काढली आणि  सोलापूर अक्कलकोट हायवे वर रास्ता रोको केला...यामुळे स्वामी समर्थ दर्शनाला आलेल्या वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या , दोन तास चाललेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन सरकार चा निषेध केला. धनगर  नेते  विधानपरिषदेचे आमदार रामहरी रुपनावर यांनी  सरकारने धनगरांना आरक्षण द्यावे अशी मागणी केली..

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धनगर समाजाच्या वतीने मागण्या पुढे रेटण्यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं... चंद्रपूरसह राज्याच्या सर्वच भागात असलेल्या धनगर समाज सदस्यांनी सप्टेंबर महिन्यात चौंडी येथे होणा-या राज्य बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्याचा निर्धार  केला आहे. 

लातूर- सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज समाविष्ट झाला होता. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी धनगर आरक्षण मान्य केले होते. मात्र त्यानंतर सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात धनगर समाजातर्फे शिरूर अनंतपाळ, मुरुड, भुसणी पाटी तसेच इतरही अनेक ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम अशी वेगवेगळी आंदोलने करण्यात आले.

औरंगाबादमध्ये रास्ता रोको

औरंगाबादमध्ये शहरातील चार  प्रमुख रस्त्यांवर धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.. सरकार फक्त आश्वासन देतेय, आरक्षण मात्र देत नाही, त्यामुळं आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलनकानी केली, पारंपरिक वाद्य वाजवत त्यांनी रस्त्यावर नृत्य करीत आंदोलन केले...