'शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आज राज ठाकरे यांच्यामुळे काकड आरती झाली नाही'

'मनसेच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंना बसला' संजय राऊत यांचा दावा

Updated: May 4, 2022, 04:21 PM IST
'शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आज राज ठाकरे यांच्यामुळे काकड आरती झाली नाही' title=

मुंबई : मशिदींवरील भोंग्याच्या मुद्दावरुन मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. जिथे जिथे मशिदींवर भोंगे वाजतील तिथे लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण केलं जाईल असा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. पण राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच बसल्याचा दावा शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 

राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे अनेक भाविकांना हिंदू मंदिरांमध्ये पहाटे होणाऱ्या काकड आरतीचा आनंद घेता आला नहाी, त्यामुळे हिंदूंसाठी आजचा काळा दिवस आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि जिल्ह्यात प्रमुख तिर्थस्थान आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर यासह अनेक मोठ्या मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरत्या होतात. काकड आरतीला मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो, पण त्याचा आनंद घेण्यासाठी मंदिराच्या आसपास हजारो लोक उभे असतात. 

आज भोंग्याचा विषय निर्माण झाल्यामुळे या देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि हिंदू भाविकांची गैरसोय झाली त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही असा गुप्तचार खात्याचा अहवाल असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मशिदीवरील भोंग्याचा विषय पुढे करुन भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचा गळा घोटला हे स्पष्ट झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

हजारो लोकांनी तक्रार केल्या आहेत, आमच्यावर अन्याय का होतो. शिर्डीतील हजारो लोकांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

ज्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे त्याविरुद्ध आता हिंदुंमध्या जागृती होतेय, आणि हिंदुच रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही, पण हिंदुंनी संयम राखावा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

भोंग्याचा नियम पाळायचा असेल तर सर्व धर्मियांसाठी आहे. याचा सर्वात जास्त फटका हा हिंदु धर्मियांना बसला आहे. मशिदीवरील भोंग्याचं काय करायचं हे कोण एक व्यक्ती घेऊ शकत नाही, त्यासाठी कायदा आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.