मुंबई: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत डोअर टू डोअर स्क्रीनिंग करावी, यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मुंबईच्या झोपडट्ट्यांच्या परिसरातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे मुंबईत भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती.
१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...
मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. मुंबईतील लोकसंख्येची भिलवाड्याशी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांचे स्क्रीनिंग करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याचे न्यायालयाने म्हटले.
धारावी झोपडपट्टी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. याठिकाणी मंगळवारी कोरोनाचे ४६ नवे रुग्ण आढळून आले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आतापर्यंत धारावीत कोरोनाचे ९६२ रुग्ण आढळून आले असून यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार
सध्याच्या घडीला देशात मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत. पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तरीही शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पालिका प्रशासनाच्या अपयशामुळे मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामुळे आतातरी मुंबईतील परिस्थितीत फरक पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचण्याची भीती व्यक्त केली.