'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया

पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. 

राजीव कासले | Updated: Aug 29, 2023, 01:53 PM IST
'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया title=

मुंबई : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवरून (Drought) सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.  ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप चांगला पाऊस (Rain) झाला नसल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधलं आहे.

'सद्य:स्थितीत 329 महसुली मंडळात पावसाचा 23 दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिकं धोक्यात आली आहेत. पिकं जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास 70 टक्के पिके शेतकऱ्यांच्या  हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे. 

खरिपातील बहुतांश पिकांचं नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राज्यावर दुष्काळाचं सावट
पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. यंदा संपूर्ण देशात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. खरं तर जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस होतो. मात्र यावेळी ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय. पावसाअभावी पिकं करपू लागलीयेत. खरीपाची ही अवस्था आहे तर रब्बीचा हंगाम कसा असेल याची कल्पना न केलेलीच बरी. राज्यात यंदा सर्वाधिक कमी पावासाची नोंद जालना जिल्ह्यात झालीय. राज्यात अनेक जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई जाणवतेय. अनेक गावांना,वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. राज्यात एकूण 1 हजार 403 वाड्यांना, तर 363 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालाच्या माध्यमातून समोर आलीय.. 

मराठवाड्यात गंभीर स्थिती
मराठवाड्यातही पावसाअभावी गंभीर स्थिती निर्माण झालीय 534 पैकी 103 मंडळांमध्ये 21 दिवसांहून अधिक काळ पाऊस झालेला नाही. एका मंडळात सरासरी 18 ते 20 गावांचा समावेश होतो. मराठवाड्यातल्या दोन हजार गावांत खरिपाची पिकं संकटात आहेत. सप्टेंबरमध्येही पाऊस झाला नाही तर पेरण्य़ांसाठी लावलेले पैसे निघतील एवढंही उत्पन्न येणार नाही. 

पावसाअभावी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. जवळपास एक ते दीड महिना उशिरा पेरण्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांचं नुकसान झालंय.  ऐन पावसाळ्यात ओढे, नाले, सिमेंटचे बंधारे अक्षरशः कोरडे पडलेत.त्यामुळे आता सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतक-यांनी केलीय.

कृत्रिम पावासाचा प्रयोग?
 पावसाअभावी राज्य मोठ्या संकटाच्या तोंडावर उभं आहे. कृत्रिम पावसाचा सरकारचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत आपण स्वतः विषय मांडलाय असं पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय़. पंचनाम्याचे कृषीखात्याला देण्यात आलेत. टंचाईचा आराखडा तयार करण्यात आलाय. एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे आता विविध स्तरातून कृत्रिम पावसाची मागणी होतेय. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रयोगाला फारसं यश येत नसल्याचं सांगत हा प्रस्ताव जवळपास फेटाळलाय. आजवर भारतात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झालेला नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

धुळे जिल्ह्यामध्ये सरासरीच्या केवळ 65% पाऊस पडलाय.  गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिलीये. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय. पावसाअभावी उभी पिकं करपताना पाहण्याची वेळ शेतक-यांवर आलीये. विहिरीतला पाणीसाठा आटल्यानं शेताला पाणी देणंही मुश्किल झालंय.