दुर्गेच्या लेकीची यशोगाथा : रेश्मा खातूंची जिद्द

प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं गणेशोत्सवाआधी निधन झालं. त्यामुळे शेकडो गणेश मुर्ती आणि नवरात्रीसाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अपूर्णच राहिलं होतं. मात्र दु:ख बाजूला सारत विजय खातू यांच्या लेकीनं त्यांच्या निधनाच्या दुस-याच दिवशी कारखान्याची जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. 'दुर्गे दुर्गट भारी' सदरात पाहुयात रेश्मा खातू यांच्या जिद्दीची कहाणी...

Updated: Sep 24, 2017, 09:35 AM IST
दुर्गेच्या लेकीची यशोगाथा : रेश्मा खातूंची जिद्द  title=

दिपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं गणेशोत्सवाआधी निधन झालं. त्यामुळे शेकडो गणेश मुर्ती आणि नवरात्रीसाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अपूर्णच राहिलं होतं. मात्र दु:ख बाजूला सारत विजय खातू यांच्या लेकीनं त्यांच्या निधनाच्या दुस-याच दिवशी कारखान्याची जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. 'दुर्गे दुर्गट भारी' सदरात पाहुयात रेश्मा खातू यांच्या जिद्दीची कहाणी...

रेश्मा खातू... राज्यातील प्रसिद्ध मुर्तीकार विजय खातू यांची कन्या... रेश्मा खरं तर असिस्टंट डिरेक्टरचं काम शिकतेय. पण अचानक एके दिवशी रेश्माला या कारखान्यात येऊन संपूर्ण काम स्वीकारावं लागलं. ऐन गणेशोत्सवाच्या काळात विजय खातू यांचं निधन झालं. पण कारखान्यात जवळपास पाचशे गणेश मूर्तीचं काम प्रलंबित होतं. तर ८२ देवीच्या मूर्ती तयार करुन वेळेत मंडळांना देण्याचं आव्हानही... 

पण वडील गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ वाजता रेश्मा कारखान्यात पोहचली. कारागीर, इलेक्ट्रिशियन, मूर्तीकार यांच्यात जाऊन उभी राहिली. धूळ, माती, पीओपी, रंग, गर्दी या सगळ्याचा सामना करत तिला शेकडो मूर्ती पूर्ण करायच्या होत्या. बाबांची आठवण आणि शिकवण या दोन्ही गोष्टींमुळे रेश्माला आपल्याच बाबांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्याचं बळ मिळालं. मला कधी वाटले नव्हते मी कारखान्यात काम करेल. पण बांबाचा वारसा पुढे न्यायचा आहे. बाबा वेगळे झालेत असं वाटत नाही. प्रत्येक मूर्तीत मला बाबा दिसतात... शेवटी बाबांचं रक्त आहे माझ्यात. म्हणून ते जमतय. मला हे काम आता आवडू लागलंय. उलट कामाचं भाग्य मला लाभलंय, असं रेश्मा म्हणतेय.

गणेशोत्सवात यशस्वी काम केल्यावर रेश्मापुढे आव्हान होतं आता नवरात्रौत्सवाचं... वडील गेल्यावर देवीची मूर्ती तयार करण्यासाठी ऑर्डर्स येतील का? हा प्रश्न तिच्या समोर होता. पण तिच्या कौशल्यानं दरवर्षीपेक्षा काही ऑर्डर्स अधिकच मिळाल्या. लहानपणापासून मूर्ती घडवण्याचं काम ती पाहत आली असली तरी प्रत्यक्षात तिनं ते कधीही केलं नव्हतं. पण आता मूर्तीची ऑर्डर कशी मिळवायची? त्यात नवीन काय करता येईल? देवीच्या मूर्तीवर कुठलं रंगकाम व्हावं? वस्त्र कुठल्या रंगाचे असावेत हे सगळं ती शिकतेय आणि आवडीनं करतेय. 
  
वडिलांचा व्यवसाय थेट कुटुंबाचा वारस म्हणून मुलाकडे जातो. त्यात तो कारखान्यात जावून काम करायचा विषय असेल तर तो घरातल्या मुलांकडूनच अपेक्षित असतो. पण कुटुंबातील मोठी मुलगी म्हणून रेश्मानं या सगळ्याचा विचार केला नाही आणि आता ती तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतेय...