NDA Ministers : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला. बुधवारी संध्याकाळपर्यंत तिसऱ्यांदा मोदी सरकारच बनणार हे निश्चित झाल्यानंतर आता मंत्रीपद कोणाला याची चर्चा रंगली आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाटेला काय येणार याची उत्सुकता आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना एकनाथ शिंदे गटाला तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून यात एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील विजयी खासदार आज दिल्लीला जाणार आहे. तर अजित पवार शुक्रवारी दिल्लीला जाणार आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. आज ते मुंबईत दोन बैठका घेणार असून त्यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ अशा कोअर गटाच्या नेत्यांचा समावेश असेल. सकाळी 10 वाजता देवगिरी निवासस्थानी ही बैठक होईल. त्यानंतर संध्याकाळी ते सर्व आमदांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तसंच लोकसभेतील पराभवावर चर्चा केली जाणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हॉटेल ट्रायडंटमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलीये.