दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : 'हत्तीणीला घडलेल्या घटनेचा प्रचंड त्रास होत होता. तिला अशा अवस्थेत जगणंही मान्य नव्हतं. काही गोष्टी तिने मनातच ठरवल्या आणि सगळी परिस्थिती स्वीकारली, असं मत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या देहबोलीवरून मांडतात. हत्तीण सलग दोन दिवस पाण्यात उभी होती. तिने जलसमाधी घेतली. त्यावरून तिने काही गोष्टी मनात ठेवल्या होत्या. हत्तीणीच्या टूशी देखील फाटल्या होत्या. जळाल्या होत्या. अशा अवस्थेत तिची जगण्याची मानसिकता अजिबातच नव्हती, अशी भावना आनंद शिंदे व्यक्त करतात.
हत्तीणीने शेवटपर्यंत तोंड वर काढलंच नाही. तिला होणारा त्रास हा होतंच होता. पण तसं भाजलेलं, फाटलेलं तोंड ती वर काढायला देखील तयार नव्हती. हत्तीणीला बाहेर येण्याचा मार्ग निश्चितच माहित होता. पण तिची मानसिकता बाहेर येण्याची नव्हती. तिच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीवरूनच ही गोष्ट लक्षात येते, असंही आनंद शिंदे सांगतात.
आनंद शिंदे यांना हा प्रकार कळल्यानंतर पहिला विचार हा तिच्या बाळाचा आला. हत्तीणीने तिच्या बाळाला आपल्या माणसांबद्दल काय सांगितलं असेल? ही घटना घडल्यानंतर पहिला विचार हाच आला की, 'आपण माणूस या पृथ्वीवर जगायला लायक आहोत का?' हत्तीणीला झालेल्या वेदना आणि आपलं बाळ आता जन्माला येणार नाही ही भावना, या दोन गोष्टी घेऊन ती हत्तीण या जगातून गेली आहे. माणसाबद्दलच्या खूप चांगल्या आठवणी घेऊन ही हत्तीण गेली नाही, याची खंत आनंद शिंदे यांना वाटते.
हत्तीशी गप्पा मारणारी व्यक्ती म्हणून आनंद शिंदे यांची ओळख आहे. सलग पाच वर्षे केरळमध्ये राहून आनंद शिंदे यांनी हत्तींवर अभ्यास केला आहे. हत्ती हा अतिशय सामाजिक, समजुतदार प्राणी आहे. केरळमधील हत्तीणीला अननसात स्फोटक घालून खायला दिली. यामुळे या हत्तीणीचं तोंड आणि जीभ भाजली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. याच अनुशंगाने हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांच्याशी झी चोवीस तासने केलेली बातचित.
यामध्ये आनंद शिंदे सांगतात की, हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. ज्या हत्तीणीचा या घटनेत मृत्यू झाला ती अवघी १५ वर्षांची होती. १२ वर्षांनंतर हत्तीणीचं शरीर प्रजननासाठी तयार होतं. म्हणजे ही हत्तीण पहिल्यांदाच मातृत्व अनुभवत होती. हत्तीणीचा गरोदरपणाचा काळ हा खूप मोठा काळ असतो. २२ महिने हत्तीण आपल्या बाळाला गर्भात सांभाळत असत.े
ही हत्तीण १५ वर्षांची होती. म्हणजे कळपात तिची मेटरन असणार, तिचा स्वतःचा एक कळप असणार ते तिचा नक्कीच शोध घेत असतील. मृत पावलेल्या हत्तीणीच्या आणि त्या नदीत आणलेले दोन हत्ती यांच्या रंबलींवरून तिच्या कळपाला काहीतरी घडलं याचा अंदाज हा आलाच असणार. यावरून माणसाकडे बघण्याचा दृष्टीकोन त्या कळपाचा काय झाला असेल?हा विचार आनंद शिंदे करतात.