मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थकलेत का? का असं घडतंय आणि काँग्रेसच्या नेत्यांना असं का वाटतंय? काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र आल्याशिवाय काही पर्याय नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांना उमगलंय... ही सल, ही खदखद सुशीलकुमार शिंदेंच्या तोंडून बाहेर पडली. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील, असे भाकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात व्यक्त केलं.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी शरद पवारांच्या घरी गेले. त्याचवेळी आपण एकत्र येऊ, जेणेकरुन काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद तरी मिळेल, असा प्रस्ताव राहुल गांधींचा होता. काँग्रेसचं लोकसभेतलं संख्याबळ ५२, त्यात राष्ट्रवादीचे ३ खासदार मिळून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नक्की मिळालं असतं... पण पवार है के मानते नही... आता लोकसभा सोडाच पवारांना तर राज्यसभेपुरतंही संख्याबळ राहणार नाही, असं एकेकाळी पवारांच्या जवळच्या माणसाचं भाकीत आहे. 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० जागा आणि राष्ट्रवादीच्या २० जागा येतील. दोन्ही पक्षाच्या मिळून ४० जागा आल्या तर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं असेल, तर दोन्ही पक्षांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नसेल' असं वक्तव्य नुकतंच संजय काकडे यांनी व्यक्त केलंय.
ज्या मुद्द्यासाठी पवारांनी राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली तो सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा मुद्दा गौण झालाय, हे पवारांनीही मान्य केलंय. पण काँग्रेस हायकमांड, काँग्रेस संस्कृती आणि राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे पवारांनी विलिनीकरण करण्याचं कधीच मनावर घेतलेलं नाही. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर दमल्याचं वक्तव्य करुन काँग्रेसनं टीकेची आयती संधी दिलीय.
निवडणुकीला सामोरं जातानाच शस्त्रं गाळली तर निवडणूक लढणार कुठल्या जोरावर... कार्यकर्त्यांमध्ये याचा संदेश काय जाईल... दमलेल्या नेत्यांची ही कहाणी सांगताना याचा विचार एकदा दमलेल्या नेत्यांनी नक्की करावा.