मुंबई : महाराष्ट्रात ठरल्या प्रमाणे पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. '२०१९ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री असं कुठे घटनेत लिहिलेलं नाही आहे. राष्ट्रपती राजवटीची भीती दाखवून आमदार इकडे-तिकडे उड्या मारतील असं समजू नका,' असा थेट इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे.
तुम्ही आम्हाला राजकारण, नैतिकता, तत्व, महाराष्ट्र ही शिकवू नका. तुम्ही आमच्या तोंडाला लागू नका, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. असा इशारा देखील त्यांनी थेट भाजपला दिला आहे.
१२ दिवस झाले तरी दिल्लीच्या एकाही प्रमुख नेत्याने महाराष्ट्राच्या या गुंत्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. दुसऱ्या दिवशीच लक्ष घालायला पाहिजे होते. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र १२ दिवस तुम्ही रखडवत ठेवला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची हिम्मत का नाही. सर्वात जास्त जागा जिंकल्या आहे तर करा सत्तास्थापन, कोणाची वाट बघत आहात. असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
निकालानंतर संयुक्त पत्रकार परिषद व्हायला पाहिजे होती. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने झाली असती तर दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणीत झाला असता. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.