मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या पूरग्रस्त स्थिती असून शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात भीषण परिस्थिती असताना सरकारच अस्तित्वात नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मंत्र्यांनी शपथ घेऊन ताबडतोब मंत्रिमंडळ स्थापन करायला पाहिजे असं मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करणं न करणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र संकटकाळात सरकारच नाही असं दिसत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. एसटी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांप्रमाणे पुरामुळे मृत्यू झोलेल्या कुटुंबियांनादेखील सरकारने तात्काळ रोख रक्कम द्यावी अशी मागणीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
'पेट्रोल-डिझेल दर कमी मात्र दुसऱ्या मार्गाने वसुली'
राज्यात पेट्रोल-डिझेल दर कमी केले. मात्र GST 20% लावून वसूल केला जात असल्याची टीकाही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याबाबतच्या याचिकांवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात तीन बेंचसमोर हे प्रकरण ताबडतोब घेतलं याचं आम्हाला समाधान आहे. सुप्रीम कोर्ट ताबडतोब सुनावणी घेऊन निर्णय देईल असं वाटलं होतं. पण आता तसं घडेल असं वाटतं आहे. सरन्यायाधीश रामन्ना निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीआधी ते योग्य निर्णय घेतल अशी अपेक्षा असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.