मुंबई: गणपती बाप्पा चांगल्या लोकांची विघ्न दूर करतो. आमच्यावरील 'ईडी'चं संकटही बाप्पा नक्की दूर करेल, असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच कोहिनूर स्क्वेअर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मनोहर जोशी यांचे पूत्र उन्मेष जोशी यांची कसून चौकशी झाली होती.
या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांनी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?
त्यांनी म्हटले की, चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. गणपती बाप्पा त्यांचेच विघ्न दूर करतो, जे स्वत: स्वच्छ असतात. माझ्या मुलाला मी सगळ्यात जास्त ओळखतो. तो काहीही चुकीचे करणार नाही. त्यामुळे त्यांच्यावरील 'ईडी'चे विघ्न बाप्पा नक्कीच दूर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ईडी'कडून राज ठाकरेंची चौकशी नेमकी कशासाठी?
यावेळी मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाविषयीही भाष्य केले. छगन भुजबळ एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यांची काम करण्याची पद्धतही चांगली आहे. अशी माणसे शिवसेनेत आली तर यशस्वी होतात. त्यांच्याबाबतीत पक्ष देईल तो आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे. किंबहुना हा आदेश मानत असेपर्यंतच मी पक्षात आहे याची जाणीव आहे, असे सूचक वक्तव्यही जोशी यांनी केले.