घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त

घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला. 

Updated: Jul 25, 2017, 06:46 PM IST
घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त title=

मुंबई : घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला. 

पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीचा त्यांच्यासमोरच अंत झाला. तर आई अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे. त्यांचा नऊ वर्षांचा  मुलगा ट्युशनला गेल्यामुळे सुदैवाने बचावला. घाटकोपरमधील बिल्डिंग ही नर्सिंग होमच्या बांधकामामुळे पडल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. तर १६ जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजून आठ ते दहा जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगा-याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय.

 घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचं बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आलेय. शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील शीतप याचं हे रुग्णालय असल्याचं उघड झालंय. त्यानं विद्या खाडे नावाच्या महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होतं. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे हॉस्पिटल सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वीच नुतनीकरण करताना आतले कॉलम तोडण्यात आले होते.

सुनील शितपनं रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांना रहिवाशांनी विरोध दर्शवला होता.  रहिवाशांनी केलेल्या विरोधाला न जुमानता शितपनं जबरदस्तीनं हे काम सुरू ठेवलं होतं. तसंच रहिवाशांना धमकावल्याचंही बोललं जातंय. या  बांधकामामुळंच इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांनीही केलाय. तर दुसरीकडे या दुर्घटनेला जबाबदार धरून एन वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.