माटुंगा रेल्वे स्थानकावर मुलीची छेडछाड

मुंबईतील धक्कादायक प्रकार 

Updated: Feb 6, 2020, 12:57 PM IST
माटुंगा रेल्वे स्थानकावर मुलीची छेडछाड

मुंबई : महिलांवर होणारे अत्याचार काही थांबायचं नाव घेत नाहीत. वर्ध्यातील हिंगणघाट, औरंगाबादमधील सिल्लोड जळीतकांड प्रकरण ताजी असताना मुंबईतील एका तरूणीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

छेडछाड करणाऱ्या विकृताने माटुंगा रेल्वे स्थानकाच्या या ब्रीजवर महिलांची छेडछाड केली आहे. दोन तरूणी जात असताना त्यातील एका तरूणीला मागून घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करताना हा विकृत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एवढ्यावरच हा विकृत थांबला नाही तर त्याने एकट्या मुलीला मागून जाऊन किळसवाणा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

हा सगळा प्रकार जानेवारी महिन्यातील असून माटुंगा स्टेशनवर दुपारी घडली आहे. तरुणी पुलावरुन जात असताना विकृत तिच्या मागून आला आणि तिची छेडछाड करुन तिथून पळ काढला. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे तरुणीला समजलंच नाही. हतबल झालेली ती मुलगी तिथून निघून गेली. मुंबईसह अनेक ठिकाणी महिलांना अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. 

हा सगळा प्रकार इतका किळसवाणा आहे की, यावर संतत्प प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. रेल्वे स्थानकावर कुणीही नसल्याचं बघत या तरूणाने छेडछाड केली आहे. निर्जनस्थळी महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना टार्गेट केलं जात आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेवर पेट्रोल टाकून भरदिवसा जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या शिक्षिकेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हे प्रकरण ताजं असतानाच एका 50 वर्षीय महिलेवर घरात घुसून रॉकेल टाकून जाळण्याचा प्रकार घडला. यामध्ये 95 टक्के भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.