हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज द्या मगच लॉकडाऊनचा विचार करा : चंद्रकांत पाटील

 भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर पक्षाची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. 

Updated: Apr 10, 2021, 08:04 PM IST
हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज द्या मगच लॉकडाऊनचा विचार करा : चंद्रकांत पाटील  title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. राज्यात कडक लॉकडाऊन लावावा का याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर पक्षाची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. 
  
 कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट आणि सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिशा कडक लॉकडाऊनच्या दिशेने आहे. परंतु फडणवीस यांनी घाईघाईने लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. अशी भूमिका घेतल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
 
 हातावरचे पोट असणाऱ्यांना नेमकं काय देता येईल हे पाहू असं अजित पवारांनी बैठकीत म्हटलं आहे. अजित पवार यांची इच्छाशक्ती असेल तर ते गरीब कुटूंबातील लोकांना मदत करू शकतात.. अडचणींचा विचार केल्याशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही अशी भूमिका आम्ही मांडली आहे. तरी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. असेही पाटील यांनी म्हटले आहे.
 
 कोरोना नियंत्रणात आणताना सर्वसामान्य लोकांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वसामान्यांचा पोटाचा विचार करावा लागेल, अशा सूचनाही पाटील यांनी केली आहे.
 
 दोन दिवसात मुख्यमंत्री विचार करून निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण येणार नाही 14 दिवसांचा लॉकडाऊन लावा म्हणणाऱ्या तात्याराव लहानेंच काय जातंय. असा टोलाही पाटील यांनी लगावला.

 भारतीय जनता पक्षाचा लॉकडाऊनला विरोध नाही. पण उपाययोजना करून निर्णय घ्या.  सरकारला आमदारांचे दोन कोटी द्यायला पैसे आहेत. मुंबईमधील नगरसेवकांना द्यायला पैसे आहेत. मुलांची हौस पूर्ण करायला पैसे आहेत. मग गरिबांच्या पॅकेजसाठी नाहीत का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.