मुंबई : हल्ली विमान प्रवासाचं फारसं अप्रूप राहिलेलं नाही. कारण, बऱ्याचदा रेल्वे प्रवासाच्याच तुलनेत विमान प्रवासाचे दर जवळपास एकसारखेच असतात. परिणामी अनेकजण विमान प्रवासालाच पसंती देताना दिसतात. विमान प्रवासाचाच विषय सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणामुळे अधोरेखित करणारा तरुण सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
मुंबईत 30 जूनला मुसळधार पाऊस पडत असतानाच श्रवणकुमार सुवर्णा नावाच्या एका तरुणाने उबर कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा दादर- प्रभादेवी भागातून डोंबिवलीच्या दिशेनं जायचं होतं. (Goa Air flight rates cheaper than uber charged in dombivli)
कॅब बुक करण्यासाठीची प्रक्रिया त्यानं सुरु केली आणि त्यानंतर समोर आलेले दर पाहून तो चक्रावून गेला. 'गोव्याला जाणाऱ्या विमानाचं तिकीट माझ्या डोंबिवलीच्या घरी जाणाऱ्या कॅबच्या भाड्याहून स्वस्त आहे', असं ट्विट त्यानं नंतर केलं.
आता तुम्हाला वाटेल, काय म्हणता पाचशे रुपयांच्या आत आलं की काय विमानाचं तिकीट? तर तसं नाहीये. तर या तरुणानं कॅब बुक करण्यासाठी म्हणून अॅप सुरु केलं तेव्हा त्याला भाडं 3 हजार रुपयांहूनही जास्त दाखवण्यात आलं.
स्क्रीनशॉट शेअर करत त्यानं नेमकं काय घडलं याची माहिती दिली. घरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या तरुणानं कॅब बुक केली तेव्हा उबर गो 3041 रुपये, प्रिमीयर 4.81 रुपये आणि उबर XL 5159 रुपये इतका दर दाखवण्यात आला.
आता या दरांची गोव्याला जाणाऱ्या विमान दरांशी तुलना केली असता, हे दरही कॅबपेक्षा कमी असल्याची बाब समोर आली. दरांमध्ये आलेली ही तेजी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली. काही नेटकऱ्यांनी या तरुणाला गोव्यालाच जाण्याचा सल्ला दिला.
Flight to goa is cheaper than my ride home #peakmumbairains pic.twitter.com/r3JLGAwQxc
— Shravankumar Suvarna (@ShravanSuvarna) June 30, 2022
Isse accha Goa hi shift ho jao dost.
— Tweeter (@simplyGAURAV007) June 30, 2022
दरम्यान, सदर कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण, कंपनीशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण ऐन पावसाच्या वेळी कॅब बुक करत होता. त्याचवेळी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. या कारणामुळे दर वाढलेले असू शकतात. काहींच्या मते अल्गोरिदम बिघाडामुळे चुकीचे दर दाखवले गेले जाऊ शकतात.