कोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!

राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे. 

Updated: Oct 28, 2020, 07:31 AM IST
कोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. टप्प्याटप्याने अनलॉक होत असताना कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळणं हे दिलासादायक आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे. राज्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता खाली येऊ लागला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपवून राज्य पूर्ण अनलॉकच्या दिशेनं पुढं जात असतानाही दर कमी होतोय, ही आरोग्य यंत्रणेसाठी खूप समाधानकारक बाब आहे. कोरोनाचा धोका कमी होण्यात सरकारच्या विविध उपाययोजनांचा वाटा तर आहेच शिवाय जनतेचा प्रतिसादही महत्वाचा आहे. 

राज्यात काल ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून  राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे. काल राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाबाबतची जनजागृती लोकांमध्ये झाल्याने मास्क, सॅनिटाईझरचा वापर वाढला आहे. कोरोना लपवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच रूग्ण तात्काळ रूग्णालयात जात आहेत. किंवा स्वत:हून आयसोलेट होत आहेत. यामुळे प्रसार रोखला जात आहे. रूग्णाच्या संपर्कात आलेले अनेकजण स्वत:हून क्वारंटाईन होत आहेत. असे असले तरी धोका अद्याप असून काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

गणेशोत्सवानंतर रूग्ण प्रचंड संख्येनं वाढले होते. आता नवरात्र, दसरा झाला असला तरी दिवाळीचा काळ कसोटीचा असेल. तसेच हिवाळ्यात व्हायरसला पोषक वातावरण झाल्यावर काय होईल, याची चिंता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे. कोरोनाचा धोका सध्या कमी झाला असला तरी तो टळलेला नाही. त्यामुळं लगेच बेफिकीर होवून चालणार नाही, त्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.