मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र....

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Updated: Apr 5, 2021, 09:25 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र.... title=

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहाता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल. असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. 'कोरोना परिस्थितीसंदर्भात राज्य ठोस पाउलं उचलत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण देखील वाढवण्यात आलं आहे. विषाणूला रोखण्यासाठी आम्ही 'ब्रेक दी चेन' या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत.' असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून ४ एप्रिलपर्यंत ७६.८६ लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. शिवाय लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं देखील पत्रात नमुद करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांसाठी 3 आठवड्यात ४५ वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे , याकरिता दीड कोटी डोस मिळण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.