दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन 2021 ला सुरूवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच ते गाजत आहे. अधिवेशनाची सुरूवात ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाला सुरूवात झाली. यामध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मोहिमेचं (Governor Bhagat Singh Koshyari appericiate CM Uddhav Thackeray for his Maz Kutumb Mazi Jababdari Campaign) कौतुक केलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढताच मुख्यमंत्र्यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम राबवली. या मोहिमेत प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत कोरोनाचे नियम पाळायचे असं आवाहन केलं होतं. या मोहिमेला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याच मोहिमेचं राज्यपाल कोश्यारी यांनी अधिवेशनात कौतुक केलं आहे.
कोविड नियंत्रणासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना राबवल्या त्या देशाला मार्गदर्शक ठरल्या आहेत. तसेच आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या या मोहिमांचा फायदाच झाल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली. जीएसटी भरपाईपोटी राज्याला केंद्राकडून २९ हजार कोटी रूपये येणं असल्याचं राज्यपालांनी अभिभाषणात म्हटलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिवेशनापूर्वी 3200 लोकांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती.