'गुजरात सरकारचा आपल्याच लोकांना स्वीकारण्यास नकार'

या मजूर बांधवांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास काँग्रेस पक्ष तयार असतानाही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही 

Updated: May 8, 2020, 12:22 PM IST
'गुजरात सरकारचा आपल्याच लोकांना स्वीकारण्यास नकार' title=

मुंबई: लॉकडाऊनमुळे देशभरात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाला असताना गुजरात सरकार आपल्याच नागरिकांना स्वीकारण्यास तयार नाही, असा आरोप राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यांनी शुक्रवारी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मुंबईहून सम्बियाली (कच्छ) गुजरातला जाणाऱ्या 1200 गुजराती बांधवांच्या प्रवासाला गुजरात सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. या मजूर बांधवांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास काँग्रेस पक्ष तयार असतानाही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही, हे दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे एका मालगाडीने रुळावर झोपलेल्या १९ मजुरांना चिरडले. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आपल्या गावी पायी चालत निघालेल्या मजुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या ठप्प आहे. त्यामुळे खिशात दमडीही न उरलेले शहरी भागातील मजूर आपापल्या गावांकडे पायी चालत निघाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे या ट्रेन्समधून मर्यादित संख्येनेच लोकांना प्रवास करता येत आहे. त्यामुळे मजुरांचे अनेक तांडे शेकडो मैलांची पायपीट करत आपल्या गावांकडे निघाले आहेत. खाण्यापिण्याची आणि आरोग्याची कोणतीही सुविधा नसताना मजुरांची अनेक कुटुंबे रस्त्यावरून दिवसरात्र चालत आहेत. महाराष्ट्रातील रस्त्यांवर हे विदारक चित्र मन विषण्ण करणारे आहे.