मुंबई : Gunaratna Sadavarte: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला वेगळेच वळण लागले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर हल्ला चढवला. त्यानंतर जवळपास 100 लोकांना आणि चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 7-8तासांपासून पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. मुंबई पोलिसांकडून सीसीटीव्ही, रजिस्टर तपासणी सुरु आहे. दरम्यान, सदावर्तेंच्या कोठडीत वाढ होणार की जामीन मिळणार याची उत्सुकता आहे.
एसटी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. त्यांच्या घरातून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. मुंबई पोलीस सदावर्ते यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टर, सदावर्तेंना भेटायला कोण कोण आलेले ते तपासत आहेत. सोबतच पवार यांच्या घरापुढच्या आंदोलकांपैकी कुणी सदावर्तेंच्या भेटीला आलेले का याचाही तपास सुरु आहे. तर दुसरीकडे आज सदावर्तेंची कोठडी आज संपतेय. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करणार का याचा निर्णय आज होणार आहे.
दरम्यान, पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 100 हून अधिक आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेयत त्यांना पुन्हा सेवेत घेता येणार नाही अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. तसेच 22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या जागी कंत्राटी खासगीकरणाचा विचार केला जाईल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.