दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्याचा निर्णय काळजी वाढवणारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, हा पुरोगामी, दलित-आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा डाव आहे. कोणाविरोधात पुरावे सापडले तर आम्ही त्याचे समर्थन करत नाही. मात्र, पुरोगामी व्यासपीठावरील व्यक्तींवरील कारवाई चुकीची असल्याचे थोरात यांनी सांगितले.
हा एकूणच प्रकार पुरोगामी विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे एखादा तपास NIA कडे सोपविण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटत असल्याची भीतीही थोरात यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने भीमा-कोरेगाव प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा मानस व्यक्त केला होता. यानंतर केंद्र सरकारने वेगाने हालचाली करत हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता.
मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास 'एनआयए'कडे देण्यास मंजुरी दिली होती. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमाचा नाही, असं सांगतानाच कोरेगाव-भीमात दलित बांधवांवर अत्याचार झाला असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.