मुंबई आणि उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. चक्रीवादळानंतर मुंबई शहरात आज

Updated: May 19, 2021, 10:54 AM IST
मुंबई आणि उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस title=

मुंबई : मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. चक्रीवादळानंतर मुंबई शहरात आज वाऱ्याचा वेग मंदावला आहे. पण पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरातही पाऊस सुरु आहे. चक्रीवादळ आल्यानंतर झालेल्या पावसामुळे मुंबईच्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, यातच सलग तिसऱ्या दिवशी हा गारवा कायम आहे. पण मे महिना सुरु असल्याने पुन्हा उन पडल्यास मुंबईकरांना पुन्हा घामाच्या धारांचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे. 

मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस होत असला तरी बेस्ट आणि लोकल सेवा सुरळीत सुरु आहे. लोकल सेवा ही फक्त कोव्हिडसाठी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सुरु आहे.

चक्रीवादळामुळे मान्सूनचाही वेग मंदावला आहे. हवामान खात्याने मुंबई, कोकण किनारपट्टीसह विदर्भाच्या काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरातला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर रिमझिम पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. 

चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर पक्षी देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू पावले आहेत, अनेक ठिकाणी पक्ष्यांचा खच दिसून आला आहे. गिरगावमध्ये पाण्याच्या टाक्या फुटल्या आहेत, तर लोखंडी पत्रा असलेली छतावरची पत्र उडाली आहेत. मुंबईत पाऊस बंद झाल्यानंतर हवेचा वेग काहीसा वाढण्याची शक्यता आहे.