तुंबई! कोसळधारीमुळं सखल भागात पाणी, 'लालपरी' ठप्प

रात्रभर सुरु असणाऱ्या पावसानं सुरुवातीलाच ही अवस्था केली आहे....   

Updated: Jul 5, 2020, 11:07 AM IST
तुंबई! कोसळधारीमुळं सखल भागात पाणी, 'लालपरी' ठप्प  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई :  मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टी आणि यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला Mumbai rain सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकिकडे मान्सून शहरात आणि राज्यात स्थिरावत असतानात दुसरीकडे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. 

मागील चोवीस तासांमध्ये कुलाबा येथे १२९.६ मिमी आणि सांताक्रुझ येथे २००.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेले काही तास सतत सुरु असणाऱ्या या पावसामुळं सायन- पनवेल महामार्गावर चेंबूर- सुमन नगर भागात मोठ्या प्रमामात पाणी साचलं आहे.

मुंबई, पश्चिम उपनगर, नवी मुंबई या ठिकाणी पावसानं चांगलाच जोर पकडला आहे. corona virus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी सुरु असल्यामुळं जनजीवन विस्कळीत होण्याचं प्रमाण कमी असलं. तरीही रस्त्यांवर अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर असणाऱ्या वाहनांना मात्र यादरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेला एकव व्हिडिओ पाहून याचा अंदाज लावता येत याहे. 
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मुंबईतील किंग्ज सर्कल परिसर दिसत आहे. जेथे साचलेल्या पाण्यामध्ये लाल परी, अर्थात एसटी महामंडळाच्या बस अडकल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे याच साचलेल्या पाण्यातून बेस्ट आणि इतर लहान वाहनं वाट काढताना दिसत आहेत.

 

किंग्ज सर्कलपासूनचं हे चित्र दादर, हिंदमाता आणि परळ परिसरातील काही भागांमध्येही पाहायला मिळत आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार रविवारी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पर्जन्यमानाची शक्यता आहे. शिवाय समुद्रात १२ वाजून २३ मिनिटांनी ४.६३ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.