मुंबई : परतीचा तसा आता अवकाळीच म्हणावा लागेल, अशा पावसाने महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. एकीकडे राज्यभरातील नेते मुख्यमंत्री निवडीत व्यस्त असताना, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास पावसाने हिरावला आहे. सुगीच्या दिवसात सलग सुरू असलेल्या पावसाने धान्य आणि कापूस पिकाचं फार मोठं नुकसान केलं आहे.
हे नुकसान एवढं भयानक आहे की, काही शेतकऱ्यांच्या घरात धान्याचा एक दाणाही नवीन सिझनमधून येणार नाहीय. यानंतर धान्य संपलं तर शेतकऱ्यांना धान्य विकत घ्यावं लागणार आहे.
सतत पाऊस असल्याने ज्वारी, बाजरी, मका यासारख्या पिकाच्या कणसाला कोंब फुटले आहेत. सर्वात जास्त फटका ज्वारी, बाजरी आणि कापसाला बसला आहे. आतापर्यंत शेतकऱ्याच्या घरी आणि शेतात शेती माल आलेला असतो. पण हा शेतीमालच पावसामुळे खराब झाला, मातीमोल झाला.
मात्र आता पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसमोर नुकसान झाल्याचा दावा कुणाकडे आणि कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरतायत पण यात. नुकसानीचा दावा करण्याचे वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत.
मुसळधार पाऊस झाल्यानंतर ४८ तासाच्या आत पिक विमा कंपन्यांना माहिती देण्यात यावी, अशी अट असल्याचे मेसेज फिरत आहेत. पण अनेक शेतकऱी असे आहेत, ज्यांनी पिक विम्याचे हफ्ते भरले आहेत. पण अजून दावा कुणाकडे आणि कसा करायचा हे देखील त्यांना माहित नाही.
तेव्हा सरकारने पिक विमा कंपन्यांना साधी आणि सोपी पद्धत शेतकऱ्यांना नुकसानीचा दावा करण्यासाठी करता येईल, अशी ठेवावी आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.