मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.

Updated: Aug 5, 2020, 05:24 PM IST
 मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईसह, उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण मुंबईत जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने आणखी २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात झाडं कोसळण्याच्या घटना घटल्या आहेत. सीएसएमटी स्टेशनच्या मागे, मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरही झाडं कोसळलं आहे. तसंच मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोरही झाडं कोसळलं आहे. मुंबईत अनेक भागात पाणी साचल्याने, ठिकठिकाणी झाडं कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली असून घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत.

पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं आहे. गिरगाव चौपाटीजवळचा रस्ता जलमय झाला आहे. तसंच जेजे हॉस्पिटलबाहेरही पाणी साचलं आहे. भायखळ्यात अनेक परिसरात रस्ते जलमय झाले आहेत. 

मुंबईतील तुफान पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ट्रेन सुरु आहेत. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा लोकल वाहतूक बंद आहे. सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे. 

हार्बर मार्गावरील सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तसंच मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूकही बंद आहे. हवामान खात्याकडून पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणातही पावासाचा जोर कायम आहे. रायगड जिल्‍हयातही वाऱ्यासह तुफान पाऊस आहे. महाडसह पोलादपूर , माणगाव , म्हसळा , अलिबाग , रोहा , पाली तळा या तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.  सावित्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.  तर कुंडलिका आणि अंबा नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलं आहे. महाड बाजारपेठेत कालपासून आलेलं पुराचं पाणी कमी झालेलं नाही. पुरामुळे १०० नागरिकांचं  स्‍थलांतर करण्यात आलं आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. माणगाव जवळ घोडनदीला पूर आल्याने वाहतूक भिरा निजामपूर मार्गे वळवली आहे.

रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने हा पूल धोकादायक झाला आहे. 

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी